Saturday, July 16, 2022

Swaye Shri Ramprabhu / स्वये श्रीरामप्रभु ऐकती

श्री राम, श्री राम, श्री राम 


स्वये श्रीरामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती

कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतीने तेजाची आरती

राजस मुद्रा, वेष मुनींचे
गंधर्वच ते तपोवनीचे
वाल्मीकींच्या भाव मनीचे
मानवी रुपे आकारती

ते प्रतिभेच्या आम्रवनातील
वसंत वैभव गाते कोकील
बालस्वरांनी करुनी किलबिल
गायनें ऋतुराजा भारिती

फुलापरी ते ओठ उमलती
सुगंधसे स्वर भुवनी झुलती
कर्णभूषणें कुंडल डुलती
संगती वीणा झंकारिती

सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या, नऊ स्वरधुनी
यज्ञमंडपीं आल्या उतरुनी
संगमी श्रोतेजन नाहती

पुरुषार्थाची चारी चौकट
त्यात पाहता निजजीवनपट
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट
प्रभुचे लोचन पाणावती

सामवेदसे बाळ बोलती
सर्गामागुन सर्ग चालती
सचिव, मुनिजन, स्त्रिया डोलती
आसवे गाली ओघळती

सोडुनि आसन उठले राघव
उठुन कवळिती अपुले शैशव
पुत्रभेटीचा घडे महोत्सव
परि तो उभया नच माहिती

Lyricist : G.D. Madgulkar
Singer : Sudhir Phadke
Music Director : Sudhir Phadke
Album/Movie : Geet Ramayan

No comments:

Post a Comment

He Shivanandana | ಹೇ ಶಿವನಂದನ ಹೇ ಶಿವನಂದನ

📜 Original Kannada Lyrics: ಹೇ ಶಿವನಂದನ ಹೇ ಶಿವನಂದನ ಹೇ ಗಿರಿಜಾಸುತೆ ಹೇ ಗಿರಿಜಾಸುತೆ ವಿಘ್ನವಿನಾಶಕ ಪಾಲಯಮಾಂ ಪಾರ್ವತೀಚ ನಂದನ ಮೋರಯಾ ಗಜಾನನ ಗಜವದನ ವಿಘ್ನವಿನಾಶ...